नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे स्मार्टफोनसाठी आवश्यक असलेल्या गॅजेट्सना मागणीही वाढली आहे. इअरफोन, ब्लूटूथ इअरफोन, पॉवर बँक यांसारखे गॅजेट्स उपलब्ध आहेत. मात्र, पॉवर बँक वापरताना जर तो उत्तम दर्जाचा नसेल तर तुमचा स्मार्टफोन खराब होऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींची तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
आपला फोन जसजसा जुना होत जातो, तसतसा बॅटरी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला तुमचा फोन जास्त वेळ वापरायचा असेल तर तुम्ही पॉवर बँक वापरू शकता. जेव्हा तुम्ही पॉवर बँक खरेदी करण्याच्या विचारात असाल तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, ते तुमचे डिव्हाईस 1% – 100% पर्यंत पूर्ण क्षमतेने किमान दोन किंवा तीन वेळा चार्ज करू शकते. म्हणजेच जर तुमच्या फोनमध्ये 3000mAh ची बॅटरी असेल तर तुम्हाला किमान 10000mAh ची पॉवर बँक खरेदी करावी लागेल.
पॉवर बँक विकत घेण्यापूर्वी, त्याची बॅटरी शक्तिशाली तसेच सुरक्षित असावी हे लक्षात ठेवावे. तसेच ही बॅटरी लिथियम पॉलिमर किंवा लिथियम आयन सेलची असावी. यासोबत त्याची बॅटरी BIS प्रमाणित असावी. पॉवर बँकचा वापर फक्त डिव्हाईस चार्ज करण्यासाठी केला जातो. अशा परिस्थितीत पोर्टची संख्याही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे किमान 2 USB पोर्ट असलेली पॉवर बँक घेण्याचा विचार करावा. याच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी अनेक उपकरणे चार्ज करू शकता.