मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनी रामदास कदम यांनी अजित पवार गटावर टीका केली होती. त्याला प्रतिउत्तर देताना अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. त्यामध्ये अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुस्लिमांचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाल्याचं दिसतंय. त्याचा फायदा आघाडीला झाला. तसेच संविधान बदलाच्या प्रचारामुळे मते कमी पडली. पण आता हा सगळा गैरसमज दूर केला जाईल, हे सांगत असतानाच अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहिला शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही विरोधात असता. सत्तेत आलाच नसता, अशा शब्दात अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना सुनावले.
अजित पवार यांना महायुतीत घेतल्याबद्दल शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा लेट आले असते तर आम्हाला 9 मंत्रीपदे मिळाली असती, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. रामदास कदम यांचं हे विधान अजितदादा गटाला चांगलंच जिव्हारी लागल्याचे दिओसून आले आहे. रामदास कदम यांना प्रतिउत्तर देताना अजितदादा गटाचे नेते उमेश पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर निष्ण साधला आहे.
याचं आधी तुम्ही चिंतन करा…
तुम्हाला भाषण करण्याची आदर सन्मानानं संधी दिली तर तुम्ही काहीही बरळणार? आम्ही ऐकून घ्यायला मोकळे नाही. तुमच्या मतदारसंघात अनंत गीते यांना लीड मिळाली आहे. तुम्ही एकनाथ शिंदे यांची लाज घालवली आहे, अशी जोरदार टीका उमेश पाटील यांनी केली आहे. आम्हीही काहीही ऐकून घेणार नाही. ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद आहे.
भाजप आणि शिवसेनेला बहुमत असतानाही अजित पवार यांना सोबत घेतलं याचं आधी तुम्ही चिंतन करा. सुनील तटकरे हे रायगडचे खासदार होते. ती आमची नैसर्गिक जागा होती, असं सांगत असताना तटकरे यांना निवडून आणण्यात रामदास कदम यांचं काहीही योगदान नाही. खर तर उलट तुमच्या मतदारसंघात ठाकरे गटाला लीड आहे. तुम्ही तर शिंदेंचीच लाज घालवली, असा घणाघाती हल्लाही उमेश पाटील यांनी रामदास कदम यांच्यावर केला.
तुमची पात्रता जेवढी…
रामदास कदम यांनी काल आक्षेपार्ह शब्द वापरले. महायुतीत चांगला समन्वय राहिला पाहिजे. एकसंघ भूमिका असयला पाहिजे. महायुतीसोबत जाणं ही आमची भूमिका असताना रामदास कदम मुद्दाम बेजबाबदार विधानं करत आहेत. तुमची पात्रता जेवढी आहे, त्या पात्रतेत मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला ठेवलं आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मंत्री केलं नाही, अशी आक्रमक भूमिका उमेश पाटील यांनी घेतली आहे.
..तर मंत्री झाले असते
दापोली हा रामदास कदम यांचा मतदारसंघ आहे. त्यांचा मुलगा तिथे आमदार आहे. त्या ठिकाणी अनंत गीते यांना चांगली आघाडी मिळालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी रामदास कदम यांच्या जीभेला लगाम घातला पाहिजे. रामदास कदम यांनी संयमाने भूमिका मांडली पाहिजे, असं सांगतानाच रामदास कदम यांनी पात्रता असती तर ते आज मंत्री असते, असा टोलाही उमेश पाटील यांनी लगावला आहे.