पुणे : राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात मोठी घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस राज्यात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज किमान तापमानात घट होण्याची शक्यात आहे. उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये हुडहुडी वाढत जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशसह उत्तराखंड क्षेत्रांमध्ये असणाऱ्या पर्वतरांगांवरून वाहणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.
राज्यातील परभणी, निफाड आणि धुळ्यात तापमानानं निच्चांकी आकडा गाठला असून, हा आकडा 10 अंशांच्याही खाली उतरल्याचं पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राच्या कोकणापासून विदर्भापर्यंतच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाचा आकडा 30 अंशांच्याही खाली आला असल्यामुळे थंडीचा प्रकोप वाढताना दिसत आहे.