सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आपल्याच एका फेसबुक पोस्टवरच्या कमेंटने सध्या वादात आला आहे. एका शिल्पात जयदीप आपटेने शिवरायांच्या कपाळावर झालेल्या वाराची खूण दाखवलीय, आणि त्याखालच्या कमेंट्समध्ये आपटेने जे उत्तर दिलं आहे, यावरुन मिटकरींनी प्रश्न उभा केला आहे.
जयदीप आपटेने फेसबुकवर 5 मे 2023 ला एक पोस्ट शेअर केली होती. In Progress… असं कॅप्शन देत महाराजांच्या एका मूर्तीचा फोटो त्यानं शेअर केला होता. शिवरायांचा पुतळा बनवताना जयदीपने जाणूनबुजून महाराजांच्या कपाळावर डाव्या बाजून वार झाल्याची एक खूण बनवली होती.
इतिहासकारांच्या मते, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अफझलखानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवाजी महाराजांवर तलवारीनं वार केला होता. तोच वार कपाळावर झाल्याने ती खूण राहिली. ही पार्श्वभूमी झाली. आता शिल्पकार जयदिप आपटेने पोस्ट केलेल्या या फोटोच्या एका कमेंटवरुन वाद सुरु झाला. आनंद सहस्रबुद्दे नावाच्या एका व्यक्तीने त्यावर कमेंट केली की, “सुरेख… मस्त डिटेलिंग केलंय… महाराजांच्या डोक्यावर घावाची खूण पण शिल्पात दिसत आहे…मस्त…”. त्यावर शिल्पकार आपटेनं उत्तर दिलं की, “तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं. बाकीच्यांना समजावून सांगावं लागतं.” पुन्हा आनंद सहस्रबुद्धेनं त्यावर रिप्लाय देताना लिहिलं की, “कलाकृती वाचून आत्मसात करावी लागते. तुझ्यासारख्या मित्रांमुळे हे शिकता येतं.”
‘पुढे आणखी एका युजरला रिप्लाय देताना जयदीप म्हणाला की, ‘मला काही वर्षांपूर्वीच हे सुचलं किंवा काम करताना एकदम आठवलं की शिवाजी महाराजांच्या शिल्पाचं काम करताना 1659 च्या आधीचा किंवा त्यानंतरचा काळ दाखवता येऊ शकतो. 1659 मध्ये अफजलखान स्वारीच्या वेळी शिवरायांना डाव्या डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीने जखम झाली होती. हाच संदर्भ इथे वापरला.’ असा रिप्लाय जयदीपने दिला होता.
दरम्यान, जयदीपच्या फेसबुक पोस्टवर या सगळ्या प्रतिक्रिया साधारण वर्षभरापूर्वीच्या आहेत. मात्र, जेव्हा मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळला. त्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या रडारवर आला आहे.