पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. आतापर्यंत पात्र असलेल्या महिलांना आतापर्यंत पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. मात्र नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे सरकार बदलल्यास डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार की नाही? असा प्रश्न अनेक महिलांच्या मनात निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकामुळे महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात, अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच साडेसात हजार रुपये प्राप्त झाले आहेत.
डिसेंबरच्या हप्त्याचे काय होणार?
महिलांच्या खात्यात आतापर्यंत 7500 जमा झाले आहेत. म्हणजेच नोव्हेंबर पर्यंतचे पैसे महिलांच्या खात्यात आले आहेत. आता महिलांना डिसेंबरच्या हप्त्याची उत्सुकता लागली आहे. आता लाडकी बहीण योजनेचा पुढील म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार, हा प्रश्न पडला आहे. दरम्यान, आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला आहे. यानंतर आता महाराष्ट्रात निवडणूक लागली आहे. या निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा लाभ महिलांना डिसेंबर महिन्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.