कोल्हापूर: बिझनेस लोन काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाने आपल्या ओळखीच्या मित्राकडून रोख रक्कम स्वीकारली. सहा महिने ताटकळत ठेवले. घेतलेले पैसेही परत केले नाहीत, त्यामुळे चिडलेल्या दुसऱ्या तरुणाने आपल्या मित्रांच्या सहकार्याने त्याचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण करून डांबून ठेवले. यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झाला. कारवीर पोलिसांनी कोणताही पुरावा सापडलेला नसताना कसून तपास करून पाच जणांवर गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. प्रकाश जयवंत दळवी (वय ४५, रा. सासनेनगर हॉस्पिटलच्या मागे, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या खूनप्रकरणी पोलिसांनी अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. अष्टविनायक पार्क, आर. के. नगर कोल्हापूर), सचिन भीमराव घाटगे (वय ३२), बट्टू ऊर्फ रोहित रामचंद्र कांबळे (वय २८), योगेश गुंडा खोंद्रे (वर्ष ३१), ओंकार अनिल पाटील (सर्व रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील पहिल्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ३ एप्रिल, २०२५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाशी नाका परिसरात एका तरुणाचा मृतदेह सापडला. करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
यावेळी चौकशी केल्यानंतर हा मृतदेह प्रकाश दळवी याचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. यावेळी मृताच्या तोंडावर, कानावर, हातावर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात पुढे आले. करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घडलेली घटना गंभीर होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी हा तपास गुन्हे शोध पथकाचे नाथा गळवे, रणजित पाटील, विजय कळसकर, सुजय दावणे यांच्याकडे सोपवला. या पथकाने मृत प्रकाश दळवी याची माहिती काढली. यावेळी तो बिझनेस लोन करून देत असल्याचे समजले. त्याचा खून होण्यापूर्वी एक दिवस अगोदर तो जरगनगर परिसरातील एका बारमध्ये बसला होता. त्याठिकाणी दोघा तरुणांनी त्याच्याशी वाद घातला, त्यानंतर त्या तरुणांनी प्रकाश दळवी यास आपल्या मोपेडवर बसवून घेऊन गेले. हे सर्व बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले होते, पोलिसांनी संबंधित तरुणांचा शोध सुरू केला, यावेळी सचिन घाडगे पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर बिझनेस लोन करणारा प्रकाश दळवी याने सचिनकडून बिझनेस लोन करून देतो म्हणून ६५ हजार रुपये वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने घेतले होते, मात्र पैसे घेऊन चार ते पाच महिने झाले; पण प्रकाश लोन करून देत नव्हता, त्यामुळे सचिन त्याच्यावर चिडून होता.
प्रकाश दळवी रात्री ज्या बारमध्ये बसलेला असतो, तेथील माहिती काढून सचिन व त्याचे मित्र असे दोघेजण जरगनगर येथील बारमध्ये २ एप्रिल रोजी रात्री आठ वाजता गेले, तेथे प्रकाश याच्याकडे पैशाबावत विचारणा केली. चिडलेल्या सचिन घाटगे याने त्याला तिचेच हाताने मारहाण केली आणि आपल्या मोपेडवर बसवून पुईखडी परिसरात नेऊन त्याला कोल्हापुरी पायताणाने बेदम मारहाण केली. चेहऱ्यावर, डोक्यावर फटके मारल्यामुळे प्रकाश गंभीर जखमी झाला. प्रकाश पोलीस ठाण्यात तक्रार करेल, या भीतीपोटी तेथून त्याला सचिन याच्या शिरोली दुमाला येथील पठार नावाच्या शेतातील खोपीत नेऊन डांबून ठेवले. रात्रभर जखमी अवस्थेत प्रकाश तेथे पडून होता. त्यानंतर सकाळी त्याला वाशी नाका परिसरात सोडले. रात्रभर मारहाण आल्यामुळे आणि उपचार वेळेत मिळाले नसल्यामुळे प्रकाशचा रस्त्याच्या कडेला पडून मृत्यू झाला होता.
करवीर पोलिसांनी या मारहाणप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला, तर तिघांना अटक केली. संशयितांनी प्रकाश याला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, उपनिरीक्षक नाथा गळवे, रणजित पाटील, विजय तळसकर, सुजय दावणे, राहुल देसाई, अशोक नंदे, शुभास सरवडेकर, योगेश शिंदे, श्रीधर जाधव, विजय पाटील, अमोल चव्हाण यांनी तपास केला.