कोल्हापूर: वाडी रत्नागिरी येथे जोतिबाचे दर्शन घेऊन कोल्हापुरात आलेला भाविक पंचगंगा नदीत अंघोळ करण्यासाठी उतरला. पोहताना दम लागल्याने सुमित सुभाष मोरे (वय २७, रा. जुळे सोलापूर) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुमित मित्रासोबत जोतिबा दर्शनासाठी आला होता. दोघेही रविवारी सकाळी जोतिबा डोंगरावर पोहोचले. दर्शन घेऊन ते दुपारी कोल्हापुरात पंचगंगा नदीघाटावर आले. उन्हाचा तडाखा असल्यामुळे सुमित पोहण्यासाठी पाण्यात उतरला. त्याला पोहता येत होते. दुसऱ्यांदा पोहण्यासाठी आत गेलेल्या सुमितला दम लागल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. सुमित बुडत असल्याचा प्रकार लक्षात येताच नदीत पोहत असलेल्या काही तरुणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
सुमितला पाण्याबाहेर काढून त्याच्या शरीरातील पाणी काढले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.