कूर (कोल्हापूर) : राधानगरी तालुक्यातील कौलव येथील भानामतीच्या अघोरी प्रकाराने मागील महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजे असताना भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथे प्रेयसीने प्रेमाचा स्वीकार करावा यासाठी प्रेमवीराने स्मशानभूमीत लिंबू, खिळा, लिखाण केलेला कागद, गुलाल याचा वापर करत वशीकरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
कोनवडे येथील स्मशानभूमीत चार दिवसांपूर्वी गावातील बुजुर्ग मंडळी, तरुण मुले एकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेले होते. स्मशानभूमीतील साफसफाई करत असताना त्यांना कागदात गुंडाळलेले लिंबू आणि त्यावर खिळा निदर्शनास आला. एका तरुणाने धाडसाने लिंबूवरील कागद काढला असता त्यावर ‘माझ्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी… ती मला मिळावी,’ असा मजकूर लिहिला होता.
आजही पुरोगामी महाराष्ट्रात अशा अघोरी प्रकारांचा वापर होत आहे, हे दुर्दैवच आहे. दरम्यान, स्मशानभूमीतील ही घटना गावात चर्चेचा विषय बनली होती. असे अघोरी प्रकार करणारे आणि करायला लावणारे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.