पाचगणी : भगवान शिवशंकरांचे पुत्र असलेल्या कार्तिक स्वामींचे दर्शन महिलांना केवळ कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते. यंदा कृत्तिका नक्षत्राच्या मुहूर्तावर हा योग रविवारी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपासून सोमवारी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असल्याने, बहुसंख्य महिला भाविकांनी दर्शनासाठी राजपुरी गुव्हे येथील कार्तिक स्वामी मंदिरात गर्दी केली होती. तीन वर्षांतून खास महिलांसाठी आलेल्या हा योग दोन दिवस असल्याने, महिलांनी मोठ्या भक्तीभावाने स्वीमींची पूजा-अर्चा केली. कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर वैवाहिक जीवन सुखी होते, तसेच धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कार्तिकी योगानिमित्त मंदिराचे पुजारी बाळासाहेब सोनटक्के व ग्रामस्थांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी झाला. मोरपीस, गूळ-खोबरे अर्पण करून भाविकांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले. पाचगणीपासून सहा किलोमीटर अंतरावर डोंगरमाथ्यावर राजपुरी या गावात कार्तिक स्वामींच्या पुरातन अशा गुफा आहेत. मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या उतरून भाविकांना आत गाभाऱ्यात प्रवेश मिळतो. कार्तिक पौर्णिमेनिमित्त याठिकाणी हजारो दिवे लावण्यात आले होते. त्यामुळे पायऱ्या आणि गुहा परिसर लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.
कार्तिकी योगानिमित्त मंदिरात दिवसभर अखंडपणे विविध गावच्या भजनांचे कार्यक्रम ग्रामस्थांनी आयोजित केले होते. दर्शनानंतर भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था राजपुरी ग्रामस्थांनी केली होती. जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्तिक स्वामी कला क्रीडा मंडळ, राजपुरी व संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेतली होती. आज दुपारी दीड वाजेपर्यंत दर्शन योग असल्याने भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी गर्दी झाल्याने रांग मारुती मंदिरापर्यंत पोहोचली होती.
दरम्यान, पोलीस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.