सोलापूर : मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करते. तू माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास त्यातून तुझा फायदा होईल, असे म्हणून फिर्यादीकडून गेल्या वर्षभरात ९ लाख २२ हजार रुपये एवढी रक्कम फोन पे, गुगल पे, पेटीएमद्वारे स्वीकारली. नंतर मात्र आरोपी ही ट्रेडिंग करत नसल्याचे लक्षात आल्याने पैशाची मागणी केली असता, आरोपी महिलेने फिर्यादीस ‘तुझ्यावर, बलात्कार केल्याचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन,’ अशी धमकी दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
यामध्ये हकीकत अशी की, फिर्यादी मिनाज रशीद हत्तुरे (वय-३४, रा. कर्णिक नगर, सोलापूर) यांची जुलै २०२३ मध्ये इन्स्टाग्रामवर आरोपी नवनीत कौर (रा. नवी मुंबई, मूळ चंदीगड पंजाब) याच्याबरोबर ओळख झाली. या ओळखीत तिने मी ट्रेडिंग शेअर मार्केटमध्ये ऑनलाइन ट्रेडिंग करते. तू माझ्याकडे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले, तर तुझे ट्रेडिंगसाठी अकाउंट काढून देते व तुला चांगला नफा मिळवून देते, असे सांगितले.
फिर्यादीने त्यास होकार देत ९ नोव्हेंबर २०२३ ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान वेळोवेळी आरोपीच्या मोबाइलवर गुगल पे, फोन पे, पेटीएमद्वारे ९ लाख २२ हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपी महिला ट्रेडिंग करत नसल्याचे फिर्यादीला समजले. तेव्हा फिर्यादीने आरोपीला पैशाची मागणी केली असता, तू जर मला पैसे मागितले तर मी माझ्यावर बलात्कार केल्याचा व विनयभंगाचा गुन्हा तुझ्याविरुध्द दाखल करेन, अशी धमकी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बनसोडे हे करीत आहेत.