बार्शी (सोलापूर): माळावर केलेल्या पारधी समाजाच्या लक्ष्मी आईच्या देवकार्यात दीर त्याच्या बायकोला उचलून घेऊन नाचला, म्हणून रागाला गेलेल्या भावजयीने चक्क दिराच्या पोटात चाकूने भोसकल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. याबाबत संगीता धनराज काळे यांनी शहर पोलिसांत जाऊ आशा ऐजिनाथ काळे हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपी आशा हिला पोलिसांनी अटक केली आहे. ५ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर उभे केले असता तिला ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेत धनराज हिरा काळे (वय ३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की, मृत धनराज काळे व पत्नी संगीता हे मुंबई येथे गजरे विकण्याचे काम करत होते. गेल्या वर्षी मृत धनराज याचा भाऊ ऐजिनाथ हा मृत झाल्याने त्याची पत्नी आशा व मुलगा विष्णू यांचा धनराज हाच सांभाळ करत होता. नागोबाचीवाडी येथे समाजाचे देवकार्य असल्याने मृत धनराज, पत्नी संगीता, भावजय आशा व पुतण्या विष्णू असे चौघेजण १५ दिवसांपूर्वी गावी आले होते. ४ ऑगस्ट रोजी समाजाचा लक्ष्मीआईचा देव असल्याने माळावर मंडप टाकून कार्यक्रम सुरू होता. यात मृत धनराज हा बायको संगीताला उचलून घेऊन नाचत होता.
दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता घरी जाऊ आशा व धनराज यांच्यात भांडण सुरू असल्याचे संगीतास समजले. घरानजीक संगीता पोहोचली असता धनराज व जाऊ आशा यांच्या भांडणाचा आवाज येत होता. त्यावेळी नवरा धनराज हा पोटाला हात लावून घराबाहेर आला व आशा हिने पोटात चाकू मारल्याचे सांगितले. शेजाऱ्यांच्या मदतीने धनराज याला मोटारसायकलवरून उपचारासाठी बार्शी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात उपचार सुरू केले. उपचार सुरु असताना असताना ५ ऑगस्ट रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास धनराज हिरा काळे याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव करीत आहेत.