सातारा : माण तालुक्यात विवाहित महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह गावालगतच्या तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना समजल्यानंतर पतीनंही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तो बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे माण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या विवाहित महिलेनं आत्महत्या का केली, याचं कारण अद्यापही समजू शकलं नाही.
ही घटना धामणी (ता. माण) येथे आज पहाटे उघडकीस आली आहे. ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय-25), स्वरांजली स्वप्नील चव्हाण (वय 6) व शिवानी स्वप्नील चव्हाण (वय 3 महिने) अशी या मृतांची नावे आहेत. तर स्वप्नील बापूराव चव्हाण (वय 30) असं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची म्हसवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील चव्हाण यांचा ऐश्वर्या हिच्याशी सहा वर्षांपूर्वी कराड येथे विवाह झाला होता. त्यानंतर ते माण तालुक्यातील चव्हाणवस्ती येथे राहत होते. स्वप्नील हा गवंडीकाम करून पत्नी व तीन मुलींचा सांभाळ करीत होता. या कुटुंबाचा संसार सुखाने सुरू असतानाच पत्नी ऐश्वर्या यांनी सोमवारी (दि. 21) मध्यरात्री घराशेजारी असलेल्या तलावामध्ये स्वरांजली व शिवानी या आपल्या दोन मुलींना स्वतःच्या कमरेला बांधून उडी घेत आत्महत्या केली. ऐश्वर्या हिची तीन वर्षांची तिसरी मुलगी ही आजीजवळ झोपली होती, त्यामुळे ती बचावली. या घटनेने माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पती स्वप्नील चव्हाण यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्यांच्यावर म्हसवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली असून म्हसवड पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सखाराम बिराजदार अधिक तपास करत आहेत.