कोल्हापूर: ‘तुमच्या घरावर कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळेच प्रत्येक कामात अडथळे येत आहेत. आम्ही ज्याप्रमाणे सांगतो, तसे धार्मिक विधी केले, तर तुम्हाला शांती लाभेल,’ अशा भूलथापा मारून फसवणूक करणाऱ्या टोळीने गंगावेस येथील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना ८४ लाख ६९ हजार रुपयांचा गंडा घातला. फसवणाऱ्या या टोळीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेल्या पोलीस महिलेचा समावेश आहे. तिच्या अटकेसाठी कोल्हापूर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.
सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिच्यावर कोल्हापुरात करणीसाठी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच ती पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आहे. लवकरच तिच्यासह अन्य संशयितांनाही अटक होईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली. दादा पाटील महाराज (पाटणकर), आण्णा ऊर्फ नित्यानंद नारायण नायक आणि सोनाली पाटील ऊर्फ धनश्री गणपत काळभोर या तिघांनी फिर्यादी कुलकर्णी यांना करणी केल्याची भीती घातली. त्यासाठी सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिची मदत घेतली. कुलकर्णी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुळीक ही इतर संशयितांसोबत कोल्हापुरात आली होती.
कुलकर्णी यांच्या घरातील अनेक विधींसाठीही ती उपस्थित होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुळीक ही तोतया पोलीस असावी, असा जुना राजवाडा पोलिसांना संशय होता. मात्र, अधिक माहिती काढताच वस्तुस्थिती समोर आली. तिच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयात गेले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती पसार झाली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी दादा पाटील महाराज आणि आण्णा नायक हे दोघे परराज्यात पळाल्याचे समजते. सध्या त्यांचे लोकेशन नेपाळच्या सीमेवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांना अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे एक पथक लवकरच नेपाळला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.