मंगळवेढा: मंगळवेढ्यातील एका खेडेगावात २७ वर्षीय विवाहित महिलेवर प्रियकरासह त्याच्या अन्य दोन मित्रांनी अत्याचार करून शारीरिक व मानसिक त्रास देत घडलेला प्रकार घरी सांगितल्यास तुझ्या दोन्ही मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिल्याने आणि त्रास सहन न झाल्याने सदर महिलेने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेने मंगळवेढा तालुका हादरला असून, या प्रकरणी संशयित आरोपी सुरज सुभाष नकाते, तौशिक चांदसो मुजावर, शुभम मोहन नकाते या तिघांना मंगळवेढा पोलिसांनी तात्काळ जेरबंद केले आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक जोडपे गेल्या चार वर्षापासून आपल्या दोन मुलांसह पुणे येथे राहण्यास होते. ते २८ जुलै २०२४ रोजी सहकुटुंब मूळ गावी राहण्यास आले. यातील संशयित आरोपी नातेवाईक व फिर्यादीचा मित्र सुरज नकाते हा पुणे येथील घरी तसेच गावाकडे असताना मृत महिलेशी बोलत असायचा व त्याची घरी ये-जा असायची. त्यामुळे कोणाला संशय येत नव्हता. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मृत महिला तिच्या आईला भेटून येते म्हणून गेली. दरम्यान, दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास गावातील एकाने फिर्यादीला तुझी पत्नी तलावात पडून बुडाली असल्याचे सांगितले. त्यावेळी तिथे फिर्यादी गेला असता सदर तलावाच्या कडेला मृत पत्नीचा मोबाईल व चप्पल ठेवलेले दिसून आले. त्यानंतर याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनला या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.
दरम्यान, मृत महिलेचे धार्मिक विधी झाल्यावर मोठ्या मुलाने सांगितले की, मृत आई व सुरज सुभाष नकाते यांच्यात मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे आई सुरज नकाते याच्यासोबत फोनवर वारंवार बोलत होती. हे समजल्यावर मुलाने आई व सुरज नकाते यांना तुम्ही असे वागू नका, असे सांगितले होते. त्यानंतर मागील तीन महिन्यापूर्वी मृत महिलेने संशयित आरोपी सुरज सुभाष नकाते यास अनैतिक संबंध बंद करू, असे वारंवार सांगून देखील घरी कोणी नसताना त्याचे मित्र तोसिफ चाँदसो मुजावर, शुभम मोहन नकाते यांनी पुणे येथील घरी घेऊन येऊन तिच्या इच्छेविरूध्द अत्याचार केला. त्यानंतर गावी आल्यावर देखील उपरोक्त तिघांनी वेळोवेळी घरी येऊन तिच्या इच्छेविरुद्ध अनैतिक संबंध प्रस्थापित केले.
सदर बाबत कोणास काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी देत असून सदरचा त्रास मृत आई हिला सहन होत नसल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान मृत महिलेला कोणाचा तरी फोन आल्याने ती फोनवर रडत होती. तेव्हा मुलाने चौकशी केली असता वरील तिघेजण फोन करून त्यांच्या सोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव टाकून मला मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत, असे सांगितले. आत्महत्येनंतर मृत महिलेची मोबाईल हिस्ट्री चेक केली असता तिघेजण वारंवार फोन करत असल्याचे दिसून आले. या त्रासाला कंटाळून मृत पत्नीने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी फिर्यादीने मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.