लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन हिरेजडीत सोन्याचे अंगठया हस्तगत केल्या आहेत. तसेच मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणुन २ मोटर सायकली हस्तगत करण्यात आल्या आह.चालु वर्षात एकुण ३५ गहाळ मोबाईलचा शोध लावुन तब्बल ५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पाचगणी पोलिसांच्या धडाकेबाज कामगिरी बद्दल पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
पाचगणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ९.३० चे दरम्यान पाचगणी येथील हॉटेलमध्ये मुक्कामी असलेलया पर्यटकाच्या हॉटेलचे रूममधुन ७० हजार किंमतीच्या हिरेजडीत सोन्याच्या दोन अंगठया चोरीस गेल्या होत्या. त्याबाबत फिर्यादी इंदुबेन जगदीश ठक्कर रा. कांदीवली मुंबई यांनी दिलेलया तक्रारीवरून पाचगणी पोलीस ठाण्यात, दि.१२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अज्ञात चोरटयाबाबत तसेच गेले मालाबाबत शोध लावण्यासाठी पोलीस अधीक्षक समिर शेख सो, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व केलेल्या मार्गदर्शनावरून पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, बालाजी सोनुने पोलीस उप निरीक्षक व तपासी अंमलदार हवालदार श्रीकांत कांबळे, पो.ना. तानाजी शिंदे, तसेच पोलीस हवालदार विनोद पवार, पो.कॉ. उमेश लोखंडे, पो. कॉ. अमोल जगताप, यांनी गुन्हा उघडकीस येण्याकरीता प्रयत्न सूर केले.
हिरेजडीत अंगठीच्या चोरीबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत गुन्हयातील आरोपी माधव केशव लटपटे (वय २० रा. कोदरी ता. गंगाखेड जि. परभणी) यास अटक करून त्याच्याकडून गुन्हयात गेलेल्या दोन्ही हिरेजडीत अंगठया असा एकुण ७० हजार रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच मोटर सायकल चोरीबाबत आरोपी प्रितम सुनिल शिंदे (वय ३० रा. दामले आळी, गंगापुरी वाई ता. वाई जि. सातारा) यास दि.१९ सप्टेंबर रोजी विश्वासात घेवुन त्याच्याकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिली.
सदर आरोपी याच्याकडुन वरील नमुद दोन्ही गुन्हयातील मोटर सायकल असा एकुण ९० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. दि.१० सप्टेंबर रोजी सायं ७.३० वाजातीच्या सुमारास शिवाजी चौक पाचगणी येथील लक्ष्मी स्टोअर समोर गॅबरेल फ्रांसीस जोसेफ (रा. सिध्दार्थनगर पाचगणी ता. महाबळेश्वर) यांनी त्यांच्या मालकीची अंदाजे ५० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची प्लेझर मोटर सायकल क्रमांक एमएच ११ सीपी ८८७८ ही पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती त्याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटया विरुध्द दि. ११ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक तानाजी शिंदे हे करीत आहेत.
तसेच दि.३० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाचगणी येथील अविराम मेडिकल येथे एकनाथ काशिनाथ पवार (रा. खिंगर ता. महाबळेश्वर) यांनी त्यांच्या मालकीची अंदाजे ४० हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा कंपनीची सिडी डॉन मोटर सायकल क्रमांक एमएच ११ एसी २७१ ही पार्क केलेली मोटर सायकल अज्ञात चोरटयाने चोरून नेहलेबाबत पाचगणी पोलीस ठाणे अज्ञात चोरटया विरूध्द दि.१३ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तानाजी शिंदे हे करीत आहेत.
या चालू वर्षी सन २०२४ मध्ये पाचगणी परिसरातुन गहाळ झालेले मोबाईलचा शोध लागण्याकरीता विशेष प्रयत्न करून गहाळ झालेल्या मोबाईलपैकी ३५ मोबाईलचा शोध लावुन संबंधीतांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने व तपासी अंमलदार पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, पो.ना.तानाजी शिंदे, पोलीस हवालदार विनोद पवार, पो.कॉ. उमेश लोखंडे, पो. कॉ. अमोल जगताप, यांनी सहभाग घेतला असुन त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीबाबत त्यांचे पोलीस अधीक्षक समिर शेख यांचे जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.