करमाळा : झोपेतून उठवल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराची लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील झरे फाटा येथे घडली. झरे फाटा येथील स्वराज्य सिमेंट पाईप कंपनीच्या खोलीत हा प्रकार घडला. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहे.

महादेवकुमार मनोज शर्मा (मूळचा बिहार, सध्या रा. झरे फाटा, करमाळा) असे मृत कामगाराचे नाव आहे. तर जयंतकुमार उमेश शर्मा असे फरार आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जयंतकुमार खोलीचा दरवाजा बंद करून झोपला होता. महादेवकुमारलाही त्याच खोलीत झोपायचे होते. त्यामुळे त्याने खिडकीतून दगड मारून जयंतकुमारला झोपेतून उठवले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

या वादाचा राग मनात धरून जयंतकुमारने रात्री सुमारे ११.४० वाजता महादेवकुमार गाढ झोपेत असताना त्याच्यावर हल्ला केला. त्याने लोखंडी हातोड्याने महादेवकुमारच्या डोक्यात वार केले. गंभीर दुखापत झाल्याने महादेवकुमारचा जागीच मृत्यू झाला.
हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळी हातोडा टाकला आणि तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
या प्रकरणी जयंतकुमार उमेश शर्मा याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 103(1) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासी अधिकारी ढोरे पुढील तपास करत असून, फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.







