पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला सुरुवात झाली असून, मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. श्रावणातील चार सोमवार तसेच शासकीय सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यंदा १३ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, १० सप्टेंबरपर्यंत श्रावणी यात्रा सुरू राहणार आहे. १७, २४, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर हे चार श्रावणी सोमवार आहेत. या दिवशी मोठ्या संख्येने भाविक भीमाशंकर येथे दाखल होण्याची शक्यता आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहनतळावरून मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाच्या ३८ मोठ्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पार्किंग क्रमांक एक ते चार येथून भीमाशंकर बसस्थानकापर्यंत या बसची वाहतूक करण्यात येणार आहे.

मंदिर परिसरात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात्रा काळात वाहनतळापासून मंदिर परिसरापर्यंत २५० पोलिस कर्मचारी आणि १०० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एक उपविभागीय पोलिस अधिकारी, एक पोलिस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, २० पोलिस उपनिरीक्षक, आरसीपी पथक आणि श्वान पथकाचा समावेश आहे.
वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियंत्रण आणि भाविकांच्या सुरक्षेवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. तसेच भाविकांना आवश्यक सूचना आणि मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध ठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुरक्षित राहावी यासाठी ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाकडून हॉटेल व्यावसायिक तसेच स्थानिक ग्रामस्थांना टीसीएलचे वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, भाविकांनी वाहने केवळ निर्धारित वाहनतळावरच पार्क करावीत आणि रस्त्याच्या कडेला वाहने उभी करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच मद्यपान करून भीमाशंकर येथे येणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पवार यांनी दिला आहे.






