लहू चव्हाण / पाचगणी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वाई विधानसभा मतदारसंघातून बावधन येथील अरुणाताई पिसाळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या वाई विधानसभा मतदार संघाचा घोळ मिटला आहे. विद्यमान आमदार मकरंद आबा पाटील यांच्या विरोधात माजी आमदार कै. मदनराव पिसाळ यांच्या सुन, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ या शरद पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत
गेल्या आठ दिवसांपासून वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघात महाविकस आघाडीचा उमेदवार ठरत नव्हता. अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. त्यामळे शरद पवार गटाचे कट्टर समर्थक डॉ. नितिन सावंत तसेच काॅंग्रेसचे विराज शिंदे यांचा महाविकास आघाडीतून पत्ता कट झाला आहे. आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे हे दोन्ही उमेदवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोण आहेत अरुणाताई पिसाळ?
मदनराव पिसाळ हे वाई मतदार संघाचे १९८५ ते २००३ सलग विस वर्षे आमदार होते. ते राज्याचे पनण मंत्री होते. त्यांचा मुलगा म्हणजे अरुणादेवी यांचे पती शशिकांत पिसाळ जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती होते. शशिकांत पिसाळ हे सूतगिरणीचे चेअरमन असून हे कुटुंब राजकारण व समाजकारणात सक्रिय आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले त्यावेळी अरुणादेवी व शशिकांत पिसाळ हे अजितदादा बरोबर गेले. परंतु त्यांचा मुलगा ॲड. विजयसिंह पिसाळ हा शरदचंद्र पवार गटात राहून युवा मंचच्या माध्यमातून काम करत राहिला.