पुणे प्राईम न्यूज: सोलापुर शहरामध्ये होणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. शहरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती.
मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील उपलब्ध असलेले मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जाते. त्यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची परवानगी नाकारत असल्याचे पोलिसांनी पत्र आयोजकाना दिले आहे.
नोटीसमध्ये काय म्हटले ?
पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आपल्या न्युज चॅनलच्या वतीने 19 ऑक्टोबर रोजी वृंदावन गार्डन, एन आय जामगुंडी फार्म हाऊस, आसरा चौक, रेल्वे ब्रिज शेजारी, जुळे सोलापुर याठिकाणी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत डिस्को दांडीया कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास गौतमी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. सदर कार्यक्रमास परवानगी मिळण्यासाठी आपला अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे प्राप्त झाला. पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सदरचे पत्र स्थानिक पोलीस ठाण्यास प्राप्त झाला आहे.
परंतु, गौतमी पाटील यांच्या यापुर्वी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचा अनुभव पाहता प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. आपला हा नियोजित कार्यक्रम 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे, परंतु सदर कालावधीत नवरात्री उत्सव सुरु असतो. त्यामुळे पोलीस ठाण्यातील उपलब्ध जास्तीत जास्त मनुष्यबळ विविध ठिकाणी बंदोबस्ताकरिता वापरले जाते. तसेच नवरात्री उत्सवादरम्यान यापुर्वीचा इतिहास पाहिला असता 2002 मध्ये दोन समाजामध्ये जातीय घटना घडल्याचा इतिहास आहे. त्याबाबत विजापुर नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव आपल्या 19 ऑक्टोबर रोजीच्या गौतमी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील डिस्को दांडीया या कार्यक्रमास विजापुर नाका पोलीस ठाण्याकडून परवानगी नाकारण्यात येत आहे.
हेही वाचा:
आहारात जास्त बटाटे खात असाल तर काळजी घ्या, आरोग्याची होते मोठी हानी