अहमदनगर : देवेंद्र फडणवीसांचे सरकार हे राज्यातील सामाजिक सलोखा उध्वस्त करण्याचे काम करत आहे. सत्तेच्या लोभापोटी विविध समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. गुरुवारी ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. संविधानात जे आरक्षण ओबीसींना मिळालं आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, अशी हाके यांची मागणी आहे. राज्य सरकारने एक माचिसची काडी टाकून महाराष्ट्रात आग लावली आहे. आग लावता येते, मात्र विझवायला वेळ जातो. सरकार मराठा आणि ओबीसी दोघांनाही फिरवत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले कि या सगळ्यावरचा रामबाण उपाय एकच जातीनिहाय जनगणना करणे. ‘जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी’, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.
मनोज जरांगेंवर काय म्हणाले वडेट्टीवार
लक्ष्मण हाके यांच्याकडून जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी आमरण उपोषण सुरु आहे. मात्र, हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर बोलताना वडेट्टीवार म्हटले की, मनोज जरांगे हाकेंच्या आंदोलनाला सरकार पुरस्कृत बोलणार असतील तर मी त्यावर काहीही बोलणार नाही. हाके यांना समाजाच्या प्रश्नाची जाण आहे. हाके यांच्या आंदोलनाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. तसेच ते कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
शेतकरी आत्महत्यांवरुन वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा
दुष्काळ आणि अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी होरपळला आहे. 2022 पासून एका रुपयाची मदतही शेतकऱ्यांना दिली गेलेली नाही. काही प्रमाणात बीड जिल्ह्यात मंत्र्यांच्या लोकांना याचा फायदा झाला आहे. याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. राज्यात बियाणे आणि खतांचे दर वाढले आहेत. हे सरकार फक्त हमीभावाच्या थापा मारत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.