लहू चव्हाण
पाचगणी: प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही कलागुण असतात, काही कौशल्ये असतात. विद्यार्थ्यांमधील या सर्जनशीलतेला, कल्पकतेला वाव मिळावा, त्यांच्या क्षमता विकसित व्हाव्यात म्हणून पाचगणी येथील विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजने अनेक उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन कला व क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन चित्रपट अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अजिंक्य शिंदे यांनी केले.
पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजच्या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. यावेळी विद्यानिकेतन स्कूल ॲन्ड ज्यूनिअर काॅलेजचे संस्थापक आनंदराव बिरामणे, रतन बिरामणे, डायरेक्टर भारती बिरामणे, मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे, डॉ. विद्या बिरामणे, मुख्याध्यापिका मृणाल महागावकर, ऑफिस काॅडीनेटर राजेन गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन, दिपप्रज्वलन व स्व.सुरेश बिरामणे यांना अभिवादन करण्यात आले. शैक्षणिक वर्षे २०२२-२३ मधील १० वी, ११ वी व बारावी मधील आदर्श विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात मॅनेजिंग डायरेक्टर विराज बिरामणे यांनी स्कूल व काॅलेजच्या उठावदार उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, वैयक्तिक नृत्याबरोबरच विविध प्रकारात कलागुण सादर केले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राध्यापक गणेश पवार यांनी सुत्रसंचलन केले. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख नितीन सपकाळ यांनी आभार व्यक्त केले.