सातारा : वडूज तहसील कार्यालयातील महसूल सहायक प्रवीण नांगरे याच्यावर 55 हजार रुपयांच्या लाच घेतल्याप्रकरणी सुमारे 1 वर्षापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अधिक तपासाअंती विद्यमान तहसीलदार बाई माने यांच्यासह आणखी 3 तलाठ्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने मूळ गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ करून बाई माने व तलाठ्यांना सहआरोपी करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुले महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
वडूज तहसीलदार बाई सर्जेराव माने, वडूज तहसीलमधील महसूल सहायक रवींद्र आनंदा कांबळे, औंध तलाठी धनंजय तडवळेकर, भोसरे तलाठी गणेश मोहन राजमाने अशी नव्याने गुन्ह्यात सहआरोपी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे दोन डंपर वडूज महसूल विभागाने पकडले होते. संबंधित दोन्ही डंपर सोडवण्यासाठी प्रवीण नांगरे याने 55 हजार रुपयांच्या लाचेची मागणी 21 नोव्हेंबर 2023 रोजी केली होती. ही रक्कम दुसर्या दिवशी म्हणजे 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवीण नांगरे याने तक्रारदार यांना त्याच्या ब्रीझा कारमध्ये ठेवण्यास सांगितली होती.
दरम्यान, सातारा एसीबीने सापळा रचून प्रवीण नांगरे याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली. सातारा एसीबीने ही कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा पुढील तपास पुणे एसीबी कार्यालयाच्या अप्पर पोलिस अधीक्षक शीतल जानवे- खराडे यांनी करण्यास सुरुवात केली होती. खराडे यांच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळत गेली व त्यानुसार या प्रकरणात नांगरे याच्याप्रमाणेच तहसीलदार बाई माने व तीन तलाठयांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मूळ दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन नांगरे याच्याप्रमाणे आणखी चार जणांची नावे सहआरोपी म्हणून घेण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सहआरोपी केले जाणार असल्याची माहिती मिळताच तहसीलदार यांच्यासह इतर तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी वडूज न्यायालयात अर्ज दाखल केला. त्या अर्जावर सुनावणी झाली असता न्यायाधीशांनी चौघांना तात्पुरता अटकपूर्व जामीन दिला आहे.