सोलापूर : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला गेला आहे. अशातच जयसिंह मोहिते पाटील यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘उत्तम जानकर यांनी मागील ५ वर्षांत मोहिते-पाटील कुटुंबाला खूप त्रास दिला आहे. वैयक्तिक माझावर खोटे गुन्हे दाखल केले.’, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू जयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच ‘लोकसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी मदत केली, पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केली नाही.’ अशी नाराजी देखील जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहिररित्या बोलून दाखवली आहे.
उत्तम जानकर यांना माळशिरसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. जानकर यांच्या प्रचारसभेत बोलताना जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकर यांच्या विषयीच नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. सध्या सोलापूरमध्ये उत्तम जानकर यांच्या जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. उत्तम जानकर आणि मोहिते पाटील लोकसभा निवडणुकीत एकत्रित आले असून विधानसभेला उत्तम जानकर यांना मदत करण्याचा शब्द मोहिते पाटील यांनी दिला होता.
त्यानुसार उत्तम जानकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस तालुक्यातून एक लाखांचे मताधिक्य मिळणे अपेक्षित असताना ते 70 हजारांवर आले. ३० हजार मतं कुठे गेली? असा सवाल उपस्थित करत तुमच्या कार्यकर्त्यांनी विरोधात मतदान केल्याचं जयसिंह मोहिते पाटील यांनी उत्तम जानकरांना सुनावले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मोहिते पाटीलांनी एकदा शब्द दिला की तो पाळला जात असतो. विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांना एक लाख पाच हजार इतके मताधिक्य मिळवून देऊ.’ असं आश्वासन देखील जयसिंह मोहिते पाटील यांनी दिले. मोहिते पाटील आणि जानकर एकत्रित आले असले तरी जुने राजकीय वाद आणि वैर या निमित्ताने उकरून काढले जात आहेत. त्यामुळे सध्या दोन्ही नेत्यांमध्ये प्रचारादरम्यान एकमेकांवर टोलेबाजी होत असल्याचे चित्र सुद्धा दिसत आहे.