अहमदनगर : अहमदनगर येथे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी हॅकर्सचा वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयातून कुठलीही तपासणी न करता शासनाच्या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून तीन जणांनी अपंगाचे प्रमाणपत्र मिळवल्याची माहिती उघडकीस आली आहे. एप्रिल 2024 मध्ये चार व्यक्तींनी अशा पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाने संबंधित असलेल्या व्यक्तींची तपासणी केली नसतानाही पाथर्डी तालुक्यातील सागर केकाण, प्रसाद बडे, गणेश पाखरे आणि सुदर्शन बडे या चार व्यक्तींनी शासनाच्या ‘स्वावलंबन कार्ड’ या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवले आहे. तसेच संबंधित व्यक्ती जिल्हा रुग्णालयात तपासणीला आल्याबाबतच्या कोणत्याही नोंद आढळलेल्या नाहीत. रुग्णालयाने तपासणी केल्याशिवाय दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग व्यक्तीला त्याची ओळख दर्शवणारा युडीआयडी क्रमांक मिळू शकत नाही. परंतु या चार व्यक्तींना हा क्रमांक मिळाला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अहमदनगरच्या ‘सावली’ दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केल्यामुळे ही बाब समोर आली आहे.
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीस अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संबंधित विभागाकडून तपासणी करून अहवाल शासनाच्या वेबसाईटवर टाकावा लागतो. त्यानंतर वेबसाईटवरून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळते. तसेच यानंतर शासकीय रुग्णालयातून अपंगत्वाचा अहवाल पाठवला जातो. यासाठी वेबसाईटची लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्याकडे असतो. परंतु, समोर आलेल्या तीन अपंग प्रमाणपत्र धारकांनी कोणतेही शासकीय रुग्णालयाचे अहवाल वेबसाईटवर न देता अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले आहे.
यावेळी तक्रारदार बाबासाहेब महापुरे बोलताना म्हणाले, आम्हाला जिल्हा रुग्णालयातून चार जणांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही ही माहिती अधिकारामध्ये घेतली. माहिती अधिकारामध्ये माहिती घेतल्यानंतर त्या दोन्ही माहितीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आम्हाला गडबड आढळली त्यानंतर आम्ही तक्रार केली. आम्ही तक्रार केल्यानंतर आम्हाला उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. एवढच नाही तर त्यांनी आणखी एक जावईशोध लावला की, आमची वेबसाईट हॅक झाली आहे. वेबसाईट झाली नाही याची आम्हाला खात्री आहे. जर तात्काळ गुन्हा केला नाही तर येत्या 6 तारखेला आम्ही जिल्हा रुग्णालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. हे चार जणांचे प्रकरण नाही याची व्याप्ती मोठी आहे अशी आम्हाला शंका आहे. त्यामुळे याचा तपास लावण्यासाठी उच्च स्तरीय समितीची नेमणूक करावी.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दुजोरा दिला आहे. संबंधित व्यक्तीने कोणत्याही प्रकारची तपासणी न करता त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे शासकीय संकेतस्थळावर आढळून येत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. कर्णबधीर प्रकारात हे प्रमाणपत्र संबंधितांनी मिळवले आहे. शासनाच्या संकेतस्थळावर हे प्रमाणपत्र आले कसे संकेतस्थळ हॅक झाले आहे का? याबाबत सायबर पोलिसांना कळवले असून सायबर पोलिसांच्या अहवालानंतरच पुढील कारवाई करता येईल, असे डॉ. संजय घोगरे यांनी म्हटले आहे. याबाबत दिव्यांग आयुक्त यांना देखील पत्र लिहिले आहे. या प्रमाणपत्राचा कोणत्याही प्रकारे वापर होऊ नये, यासाठी शासनाच्या संकेतस्थळावरून हे प्रमाणपत्र हटवण्याबाबत विनंती केली असल्याचे डॉ. संजय घोगरे यांनी यावेळी सांगितल आहे.