कोल्हापूर : राज्यात काही दिवसांपासून अपघातांमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. अशातच आता कोल्हापूरमधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. देवगड-निपाणी राज्य मार्गावर ट्रक आणि बोलेरा गाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे तर ४ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सोळंकुर गावचे असल्याची माहिती मिळत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देवगड-निपाणी राज्य महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. देवगड-निपाणी राज्य मार्गावरील मांगेवाडी गावाजवळ मध्यरात्री बोलेरो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील मृत तरुण हे कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावाचे आहेत. ते सरावडे गावाहून सोळंकुरकडे निघाले होते.
यावेळी राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी गावाजवळ त्यांच्या बोलेरो गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरा कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
रोहन संभाजी लोहार (वय 23), आकाश आनंदा परीट (वय२४), शुभम चंद्रकांत घावरे (वय२३) अशी मृत तरुणांची नाव आहेत. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेल भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मृत पावलेले सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावाचे असून ऐन गणेशोत्सवामध्ये घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.