कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. असून घटनेनंतर ग्रामस्थांनी शाळेत मोठा गोंधळ घातला होता. कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केर्ले गावात आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
या घटनमध्ये स्वरूप माने असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. केर्ले येथील कुमार व कन्या हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा सहावीच्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे तो आज सकाळी शाळेत गेला असता तो गेटजवळ आला आणि तेवढ्यात लोखंडी गेट तुटून पडल्याने त्याखाली तो दबला जाऊन यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान सदर मुलगा हा लघूशंकेसाठी जात असताना शाळेचे गेट अंगावर पङल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं शाळा प्रशासनाने सांगितले. मात्र या घटनेने शाळा प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. मुलाच्या मृत्यूमुळे पालकांनी एकच टाहो फोडला. तर ग्रामस्थांनी शाळेत गोंधळ घातला होता. तसेच घोषणाबाजी करत शिक्षक व शाळा प्रशासनाला जाब विचारला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.