सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात कुगाव (ता. करमाळा) ते कळाशी (ता. इंदापूर) या दरम्यान प्रवाशी बोट उलटली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. धरणात बुडाल्यांमध्ये एक महिला, तीन पुरुष आणि दोन मुलांचा समावेश आहे. या बोटीतून एकजण पोहून कडेला आला आहे.
गोकुळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.
पोलिस उपनिरीक्षक राहुल डोंगरे असे यातून वाचलेल्या तरुण पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. बोट उलटल्यानंतर त्यांनी धाडसाने पोहत पोहत कळाशीकडे काठ गाठला व आपला जीव वाचवला आहे. अंगावरचा थरकाप उडविणारी घटना घडली आहे. दरम्यान बचाव कार्य वेगाने सुरु आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत बेपत्ता झालेल्यांपैकी कोणीही सापडले नाहीत. या घटनेची माहिती समजताच कुगान व परिसरातील ग्रामस्थ, तरुणांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
या घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. बोट उलटून बुडालेल्यांचा चार बोटींच्या माध्यमातून शोध सुरु आहे. तसेच एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. मध्यरात्री उशिरापर्यंत शोध मोहिम सुरुच होती. मात्र, अंधारामुळे काहीही हाती लागले नाही. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधकार्याविषयी माहिती घेतली.