सातारा : माझं ग्रामीण भागात चांगलं काम आहे. भाजपने कमळ या चिन्हावर सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याची संधी मला द्यावी. सातारा लोकसभा मतदारसंघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी, अशी इच्छा नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. तसेच उदयनराजे यांनी सबुरीने घ्यायला हवे होते. महायुतीमध्ये लढत असताना अजित पवार गट आणि भाजपने सातारा लोकसभेवर दावा केला आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करायला हवा’, असेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून आपापल्या उमेदवारांची घोषणा केली जात आहे. भाजपकडूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पण सातारा लोकसभा मतदारसंघातून अद्याप कोणालाही उमेदवारी मिळालेली नाही. त्यातच राज्यसभा खासदार असलेले उदयनराजे भोसले हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. सध्या ते दिल्लीत आहेत. त्यावरच नरेंद्र पाटील यांनी भाष्य केले.
ते म्हणाले, ‘उदयनराजेंना सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवायची असली तरी भाजपने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही, असे दिसते. साताऱ्यात त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय प्रदेश भाजप नेत्यांच्या हाती नसल्याने उदयनराजेंनी थेट दिल्ली गाठली. ते राजे असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांना तातडीने भेट देतील, अशी त्यांची अपेक्षा असावी. मात्र, अमित शाह यांनी त्यांना तीन दिवस ताटकळत ठेवलं. दिल्लीतील निवासस्थानी शहांच्या निरोपाची वाट पाहण्याखेरीज राजेंना काहीही करता आलं नाही’.