सातारा : उदयनराजे भोसले यांचे साताऱ्याच्या कोरेगाव येथील एका कार्यक्रमातील भाषण जोरदार व्हायरल होत आहे. या भाषणात त्यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. तसेच उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या सातारा लोकसभा निवडणुकीच्या चुरशीच्या लढाईत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात विजय मिळविल्यामुळे उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचाच हात राहील, असे सांगत दंड थोपटले. ते शुक्रवारी कोरेगाव येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शाब्दिक फटकेबाजी केली. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलोय. आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले. आता कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव महेश शिंदे, शिवेंद्रराजे, अतुल भोसले, मनोज घोरपडे हे माझ्यासोबत आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
उदयनराजे भोसले यांचा विजय..
सातारा लोकसभा निवडणुकीच्या लढाईत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. या विजयानंतर जलमंदिर पॅलेसमध्ये उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून एकच जल्लोष केला होता. या विजयानंतर गुलालात माखलेल्या उदयनराजे भोसले यांची विजयी मिरवणूक सर्वांच्याच लक्षात राहणारी होती.
उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी राज्यसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे भोसले दिल्लीत वाट बघावी लागली होती. अनेक प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि भाजप नेतृत्त्वाने त्यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली होती.