मोहोळ: चार वर्षीय लहान बहिणीला कडेवर घेऊन मोठी बहीण ऊसाच्या फडात चालू असलेल्या ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक तिचा पाय गिअरवर पडून ट्रॅक्टर तसाच पुढे गेल्याने दोघी बहिणी खाली पडल्या. त्या दरम्यान ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन नीता राजू राठोड व अतिश्री राजू राठोड या सख्ख्या बहिणी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यातील आष्टे गावच्या हद्दीत सुरू असलेल्या ऊस तोडीच्या फडात ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शानूबाई राजू राठोड (रा. पाटागुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) या पती राजू राठोड, मुली ज्योती, नीता, अंतिश्री, भाग्यश्री, गीता व एक मुलगा अभिनंदन असे एकत्रित राहात असून ते ऊसतोड मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजू राठोड हे लोकनेते साखर कारखाना, अनगरच्या माध्यमातून ऊस वाहतुकीस असलेल्या ट्रॅक्टर (क्र. एम.एच. २४- डी.७१४७) या सोबत ऊस तोडणीचे काम करतात. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी शानूबाई राठोड व त्यांचे पती राजू राठोड हे आष्टे येथे कुंडलिक गावडे यांच्या शेतातील ऊस तोडणीचे काम संपल्यावर फडातील साहित्य गोळा करीत होते.
ऊसाच्या बांधावर असलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. २४ डी. ७१४७) चालक सुनील गुलाब राठोड (रा. डिगरस, ता. कंदार, जि. नांदेड) याने तसाच चालू ठेवला होता. दरम्यान, त्या ट्रॅक्टरमध्ये नीता राजू राठोड (वय २०) ही लहान बहीण अतिश्री (वय ४) हिला कंबरेवर घेऊन चढत असताना चालू असलेल्या ट्रॅक्टरच्या गिअरवर तिचा पाय पडल्याने अचानक गियर पडून ट्रॅक्टर पुढे गेला. त्यामध्ये दोघीही खाली पडल्या. चालू असलेला ट्रॅक्टर दोघींच्याही अंगावरून गेला. यामध्ये त्या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या.
या प्रकरणी मृत मुलींची आई शानूबाई राठोड यांनी ट्रॅक्टर चालक सुनील राठोड याच्यावर स्वतःच्या ताब्यातील ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालू ठेवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल क्षीरसागर हे करीत आहेत.