सोलापूर : सून आणि नातवाला घरातून घेऊन जाण्यासाठी विरोध केल्याने सासरच्या लोकांनी घराजवळ बेकायदा जमाव जमवून लोखंडी रॉडने मुलासह त्याच्या पित्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बोळकोटे नगर येथे सोमवार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली. गणेश शिंदे आणि अमरनाथ शिंदे (दोघेही रा. बोळकोटे नगर, सोलापूर) अशी जखमी झालेल्या पिता-पुत्राची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला येथील संतोष लखमू चव्हाण, सुरेश सीताराम भोसले, राधाबाई संतोष चव्हाण, अंकुश संतोष चव्हाण, अभिमान भीमराव माळवे, गयाबाई भीमराव माळवे, कमळाबाई अभिमान माळवे, करण धर्म इंगोले अशा ८ जणांनी बेकायदा जमाव जमवून गणेश अमरनाथ शिंदे याच्या घराजवळ गोंधळ सुरू केला.
सून आणि तिच्या मुलाला माहेरी सोबत घेऊन जाण्याच्या विषयावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यांना विरोध करत असताना वरील आरोपींनी मिळून जावई गणेश शिंदे आणि त्याचे वडील अमरनाथ शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी व डोक्यात लोखंडी रॉड मारत मारहाण केली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत अमरनाथ शिंदे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. आरोपींच्या अटकेसाठी एक पथक सांगोला येथे रवाना झाले आहे. याचा अधिक तपास फौजदार गाढवे करीत आहेत.