नगर: नगर शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असलेल्या अवैध कत्तल आणि गोमांस विक्रीवर कोतवाली पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुप्त बातमीदाराकडून अहमदनगर शहरातील झेंडीगेट येथील आरआर बेकरीसमोर गोमांसाची एका शेडमध्ये विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सदर ठिकाणी धाड टाकली. मांस विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलीसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास पकडले. फिरोज समशेर शेख (वय-३९, रा.मूळा बाब जवळ कोठला घास गल्ली, अहमदनगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे गोमांस व सतूर ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच आठ डिसेंबर रोजी सकाळी कोतवाली पोलिसांनी शहरातील पंचपीर चावडी येथील चाफे फरसाण दुकानाच्या मागील बोळीत गोमांसाची करणाऱ्यावर कारवाई केली. अदनान फारूक कुरेशी (वय २२, रा.जुने नगर झेंडीगेट अहमदनगर) याला गोमांसासह जागीच ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ २० हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. या दोन्हीही आरोपीवर भा.द.वी. कलम २६९, महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (अ), (क), ९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार तणवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींच्या पथकाने केली आहे.