सातारा : ‘मी बापू यादव कोल्हापूर जेलमधून बोलतोय. सातारा कोर्टातील जामीन अर्जास विरोध केलास तर तुला मारून टाकीन,’ अशी धमकी दिल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांना अटक केली.
आकाश सुरेंद्र भाकरे, संकेत सोमाजी वाठारकर (रा. नेलें, ता. वाळवा, जि. सांगली) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मोहन शंकर भोईटे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) यांच्या मोबाईलवर ३० मार्च २०२४ रोजी फोन आला. त्या फोनवर ‘मी बापू यादव बोलतोय,’ असे सांगितल्यानंतर मोहन भोईटे यांनी कोण बापू यादव, असे विचारले. यानंतर संबंधिताने पुन्हा मी संदीप यादव बोलतोय, असे सांगून तू जामीन अर्जास विरोध केला, तर तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली.
या प्रकारानंतर मोहन भोईटे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा हवालदार शिवाजी वायदंडे यांनी तपास सुरू केल्यानंतर तो फोन संशयित आरोपी संकेत वाठारकर याने केल्याचे समोर आले. परंतु, सीमकार्ड आकाश भाकरे याचे होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केली. एवढेच नव्हे, तर कळंबा कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना त्यांनी सीमकार्ड पुरविल्याचाही पोलिसांना संशय आहे. या दोघांकडे त्या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत. पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.