सांगोला : सध्या नवरात्री सुरु आहे. त्यामुळे भक्तजण भवानी मातेच्या दर्शनासाठी जातात. अशातच तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे निघालेल्या भाविकांच्या भरधाव वेगाने जाणा-या मोटारीने मालट्रकला मागून धडक दिली. या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधील दोन भाविकांचा मृत्यू झाला आहे तर तीनजण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात सोमवारी पहाटे सोलापूर-सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे घडला आहे.
सुखदेव बामणे (वय 40) आणि नैनेश कोरे (वय-31) (दोघेही रा. नांदणी, ता. शिरोळ जि. कोल्हापूर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. तर अनिल शिवानंद कोरे (वय-42 रा, नांदणी, ता. शिरोळ), सुधीर चौगुले (वय-35,रा.वडगाव,ता. हातकणंगले), सूरज विभुते (वय-21, रा.कोथळी, ता. शिरोळ) हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व पेठवडगाव येथील पाच मित्र मोटारी (एमएच 09- एफबी 3908) मधून नवरात्रीनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करुन परत निघाल्यावर सांगोल्याजवळील चिंचोली बायपासवर त्यांच्या भरधाव मोटारीने डाळिंब घेऊन जाणा-या 16 चाकी मालट्रक (एमपी 20- झेडएम 9518)ला मागून जोराची धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. त्यात दोन जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेले सूरज विभुते यांनी मोटारचालक अनिल कोरे यांच्याविरोधात सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या भीषण अपघातानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त मोटार रोडवरुन बाजूला काढून जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले.