-सागर घरत.
करमाळा : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) पहिल्याच दिवशी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून 50 अर्जांची विक्री झाली आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी योग्य नियोजन केले आहे. येथे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी संपूर्ण परिसरावर सीसीटीव्हीची नजर आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात एका जागेसाठी निवडणूक होत आहे. यासाठी करमाळा तहसील कार्यालय येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उमेदवारांना सुलभपणे अर्ज दाखल करता यावा, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दक्षता घेतली आहे. अशोक ज्ञानदेव वाघमोडे (रा. निलज, ता. करमाळा) यांनी न्यू रासप या पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर बाळासाहेब मछिंद्र वळेकर (रा. निंभोरे, ता. करमाळा) यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे व माहिती विचारण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी 50 अर्ज इच्छुकांनी खरेदी केले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मरोड यांनी दिली आहे.