सांगली : प्लॉट विकसित करण्यासाठी आणि बिअर शॉपीला भांडवल देण्याच्या नावाखाली एका व्यापाऱ्याची २६ लाख ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. प्रफुल्ल कमलाकर (रा. सुरेखा पॅलेस, ८० फुटी रस्ता, इंटक भवन समोर, विश्रामबाग) असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
राजू ऊर्फ रशीदखान बाबासाब जमादार (रा. डी-मार्टच्या मागे, शंभर फुटी रस्ता, सांगली ) याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. रशीदखान याने प्रफुल्ल कमलाकर याच्याकडून प्लॉट विकसित करण्यासाठी आणि बिअर शॉपीला भांडवलीसाठी २६ लाख ५०० रुपये घेतले होते. मात्र, एवढी मोठी रक्कम परत करण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कमलाकर यांचा कुपवाड एमआयडीसीमधील प्लॉट विकसित करण्यासाठी संशयित जमादार याने १५ लाख रुपये घेतले होते. या रकमेवर २५ लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. तसेच, मिरजेतील गुरू बिअर ॲन्ड वाईन शॉप चालविण्यासाठी फिर्यादी कमलाकर यांच्याकडून १२ लाख रुपये घेतले होते.
१६ नोव्हेंबर २०१७ ते २५ जानेवारी २०१८ या काळात हा व्यवहार झाला. फिर्यादी कमलाकर यांनी संशयित जमादार यास बँकेतून ऑनलाईन २६ लाख २५ हजार रुपये दिले होते. वारंवार मागणी करूनही जमादार यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कमलाकर यांना लक्षात आले. त्यामुळे जमादार विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.