कोल्हापूर : ‘आमचा घोडा सुटून तुझ्याकडे आला आहे. तो कुठे आहे सांग,’ असे धमकावत तिघा तरुणांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलास जबरदस्तीने दुचाकीवरून रुई येथील जनावरांच्या गोठ्यात नेऊन हात पाय बांधले. त्यानंतर त्याला काठीने बेदम मारहाण केली. जवळच्या विहिरीजवळ नेऊन सांग नाही तर विहिरीत फेकतो, अशी भीती घातली. या प्रकरणी पीडित मुलाच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कन्हैया मारुती आंबी (वय १९), ओंकारदर्शन (पूर्ण नाव, वय माहिती नाही, रा. रुई, ता. हातकणंगले) आणि आणखी जणावर बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ चे कलम ७५ नुसार रविवारी रात्री दहा वाजता गुन्हा दाखल झाला आहे. कन्हैया आंबी याचा घोडा सुटून गेला होता.
हा घोडा ११ वर्षांच्या मुलाने आपल्याकडे बांधून ठेवला आहे, असा समज करून रविवारी दुपारी तिघा संशयितांनी ११ वर्षांच्या मुलास दुचाकीवर जबरदस्तीने बसवून रुई गावातील पवन हुल्ले यांच्या शेतातील गोठ्यात नेले. तेथे काठी व प्लास्टीक पाईपने बेदम मारहाण केली. विहीरीत फेकणार अशी धमकी दिली. दुपारी दोन वाजता हा मुलगा त्यांच्या तावडीतून सुटून घरी गेला. घडलेला सर्व प्रकार त्याने पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी रात्री १० वाजता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कन्हैया आंबी याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.