सोलापूर : जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात करकंब येथील मोडनिंब रोडलगत परदेशी यांच्या शेतातील तळ्यामध्ये पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. ही घटना शनिवारी, १३ जानेवारीला सायंकाळच्या सुमारास घडली. मनोज अंकूश पवार (वय ११), गणेश नितीन मुरकुंडे (वय ७), हर्षवर्धन नितीन मुरकुंडे (वय ९) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी करकंब शहरालगत मोडनिंब रस्त्यावर परदेशी यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात तीन लहान मुले पडल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. करकंब पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या तलावामध्ये मनोज अंकुश पवार, गणेश नितीन मुरकुंडे आणि संस्कार नितीन मुरकुंडे ही तीन शाळकरी मुले पडल्याची माहिती पोलिसांना दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. रात्री ८ वाजता सुमारास मृतदेह हाती लागले. त्यांना बाहेर काढताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. तीनही मुलांचे मृतदेह रात्री शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ही मुले सायंकाळी उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र, ही मुले शेततळ्यात पडली कशी आणि नेमकी किती वाजता पाण्यात पडली? हे काेणालाही सांगता येत नव्हते. या दुर्दैवी घटनेने करकंबवर शोककळा पसरली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरू होते.