सोलापूर: शेततळ्याची संख्या वाढत असताना आता, त्यात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशीच एक घटना पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे घडली. मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घडली आहे.
मनोज पवार (वय 11 वर्षे), गणेश मुरकुटे (वय 7 वर्षे), हर्षवर्धन मुरकुटे (वय 9 वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.
करकंब शहरालगत मोडनिंब रोडवर परदेशी यांचे शेत आहे. त्या असलेल्या पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडली. पोहोता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला. घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढले. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब व परिसरात शोककळा पसरली आहे.
संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून काही दिवसांपूर्वी चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती मुलेही लहान होती. बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय 12 वर्षे), अफरोज जावेद शेख (वय 12 वर्षे), जावेद शेख (वय 14 वर्षे), अबरार जावेद शेख (वय 12वर्षे) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चारही मुलांची नावं आहे. पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढून घाटी दवाखान्यात पाठवले होते, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.