अहमदनगर : राज्यात विधानसभा निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेतेत दावे-प्रतिदावे करताना दिसत आहे. अशातच सुजय विखे पाटील यांनी सुद्धा आपले दंड थोपटले आहे. ‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणे सुद्धा अवघड झाले आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहते का? अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब थोरात यांची 40 वर्षातली दहशत मोडून काढणार आहे,’ असा निर्धार करत भारतीय जनता पक्षाचे नेते सुजय विखे पाटील यांनी विधानसभेसाठी दंड थोपटलेत. संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील?
“आजची सभा ही संगमनेर विधानसभेच्या परिवर्तनाची नांदी असणार आहे. चाळीस वर्षाची दहशत मोडून काढणारी आजची सभा आहे. चाळीस वर्षात तुम्हाला महिलेच्या डोक्यावरचा हंडा काढता येत नसेल तर तुम्हाला विधानसभेचा फॉर्म भरायचा सुद्धा अधिकार नाही. मला तिकीट नाकारलं हे माध्यमांवर मीडियात पाहिले, कोणत्या सूत्रांनी ही माहिती दिली? यांची हवा इतकी टाईट झाली का आता हे बातम्या सुद्धा पेरायला लागले. चाळीस वर्षे तुम्ही सेटलमेंटच राजकारण केले,” अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली.
सुजय विखे पुढे म्हणाले की, “आता असा गडी आलाय, की जो तुमचे ऐकणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे आता आमदार होणं सुद्धा अवघड झालं आहे. मुख्यमंत्री सोडा, यांच्या नावापुढे आमदार तरी राहतं का? अशी परिस्थिती झाली आहे. लोकसभेला दुर्दैवाने माझा पराभव झाला. यांना आणि यांच्या कार्यकर्त्यांना लय आनंद झाला. आरे हटा, माझा पराभव तुम्ही करू शकत नाही. लोकसभा निवडणूक धर्म आणि जातीच्या नावावर झाली म्हणून सुजय विखे पडला. विकास कामाच्या आधारावर निवडणूक झाली तर महाराष्ट्रात कुणामध्ये दम नाही सुजय विखेला पाडायचा,” असा हल्लाबोलही सुजय विखे पाटील यांनी केला आहे.