सांगली : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी, नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. तर सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सांगलीमध्ये कृष्णा नदीला पूर आला आहे. सांगलीतील कृष्णेची पाणीपातळी 40.5 फुटावर पोहोचली आहे.
बुधवारी (दि.31 जुलै) कृष्णेच्या पाणी पातळीत घट झाली होती. परंतु काल रात्रीपासून पुन्हा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली. सांगलीमध्ये कोयनेतून येत असणाऱ्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून आणखीन विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
कृष्णा नदीची 40 फूट ही इशारा पातळी आहे. पावसाचा जोर वाढला तर या पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सांगलीतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढायला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला महापुर येणार का याबाबत चिंता पुन्हा एकदा वाढू लागली आहे.