लहू चव्हाण
पाचगणी : महाराष्ट्राचं नंदनवन, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरिस्थान पाचगणी परिसरातील निसर्ग हिरवाईने नटला आहे. परिसरातील पर्वतरांगा रंगीबेरंगी रानफुलांनी व हिरव्यागार गवतांच्या गालिचांनी बहरून गेल्या आहेत. निसर्गाची अद्भुत लीला श्रावण महिन्यानंतर या ठिकाणी पहावयास मिळते. उंच पर्वतरांगा त्यामधून हिरवेगार गवतांचे गालीचातून रंगीबेरंगी फुले डोकावू लागतात. येणाऱ्या पर्यटकांना आपल्या सौंदर्याकडे पाहण्यासाठी लक्ष्य वेधून घेतात.
पाचगणी शहर व परिसरातील निसर्ग सध्या चांगलाच बहरला आहे. केवळ उन्हाळ्यातच पाचगणी महाबळेश्वरला पर्यटक न येता, आता बारा महिने या निसर्गरम्य पर्यटनस्थळी पर्यटक हजारोच्या संख्येने भेट देत असतात. यातच पाचगणी येथील पांगारी भिलार कासवंड टेबल लँड सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट हा परिसर हिरव्यागार निसर्गाने चांगलाच बहरला आहे. येणारा प्रत्येक पर्यटक या हिरव्यागार निसर्गाचा फोटो व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय राहत नाही. पाचगणीतील संजीवन विद्यालयाचं मैदानाचे पठार त्याचबरोबर अंजुमन इस्लाम पठार भिलारचे पठार हे सर्व रंगीबेरंगी फुलांनी बहरले आहे.
फुलांचे कास फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखली जाते. त्याचपाठोपाठ पाचगणी भिलार परिसरात फ्लॉवर व्हॅली नव्याने उदयास येऊ लागली आहे. पाचगणी परिसरातील रस्तेदेखील मिकी माऊस लव्हेंडर व पांढऱ्याशुभ्र विविध रंगीबेरंगी फुलांनी दुतर्फा सजले आहेत. सध्या रंगीबेरंगी फुलांची कास फ्लॉवर व्हॅली नुकतीच सुरू झाली आहे. मात्र पाचगणीत पिवळ्या धमक फुलांनी परिसरातील सर्वच पठार बहरला आहे.