सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात सुरु असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा ऑक्टोबर महिन्यात पोलिसांनी पर्दाफाश केला होता. आरोपी चंद्रमौळी एमआयडीसी आणि चिंचोळी एमआयडीसी येथील कारखान्यात मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ तयार करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मुख्य सुत्रधाराला कर्नाटकातल्या कलबुर्गी येथून अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराला हैदराबाद येथून अटक केली आहे.
सोलापूर ग्रामीण आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपींचा प्रयागराज, उत्तर प्रदेश, रिवा मध्य प्रदेश, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, तेलंगणा, गुवाहाटी, आसाम या ठिकाणी जाऊन शोध घेतला. दरम्यान, उत्तर प्रदेश राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील बरगढ, कर्नाटकातील बिदर, तेलंगणा येथील जहीराबाद या ठिकाणाहून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल ८ कोटी ८२ लाख ९९ हजार २०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एमडी, तसेच यासाठी लागणारा कच्चा माल, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल जप्त केला आहे.
कर्नाटकतील कलबुर्गी येथून आरोपी ताब्यात
या टोळीचा मुख्य सूत्रधार हा कर्नाटक, तमिळनाडु, आंध्र प्रदेश, राजस्थान या भागातील गुन्हयाचा मुख्य सुत्रधार आहे. या भागात तो आपले अस्तित्व लपवून राहत होता. तसेच राहण्याची ठिकाणे सतत बदलत होता. त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता. १४ फेब्रुवारी रोजी हा आरोपी कर्नाटकतील कलबुर्गी येथील लुंबीनी ग्रॅन्ड हॉटेल येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबीचे पथके कलबुर्गी येथे जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तर त्याच्या साथीदाराला हैद्राबाद येथून अटक करण्यात आली.
आरोपीवर वेगवेगळ्या ठिकाणावर तब्बल १० गुन्हे
मुख्य आरोपीचे राज्य व आंतरराज्य गुन्हे अभिलेख तपासणी केली असता, त्याच्यावर २०१० पासुन महाराष्ट्र आणि इतर राज्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मोहोळ, खार, नाशिक रोड, माणिकपूर, नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई, मुरबागअली (कर्नाटक), ओंगल (आंध्रप्रदेश), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चेन्नई, हैदरबाद, अहमदाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल असून आरोपीला २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सादर कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस अंमलदार सलीम बागवान, विजयकुमार भरले, दिपाली जाधव, अन्वर अत्तार, विनायक घोरपडे, अक्षय डोंगरे, समर्थ गाजरे, यश देवकते तसेच सायबर पोलस स्टेशनचे पोलीस अंमलदार अभिजीत पेठे, व्यंकटेश मोरे, महादेव काकडे यांच्या पथकाने केली.