इंदापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे सहलीच्या बसला टेम्पोची धडक बसल्याने अपघात झाला असून, या अपघातामध्ये एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर बसमधील इतर शिक्षक व विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक उपचारांसाठी त्यांना तत्काळ अकलूज येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल मंगळवारी (ता. १९) रात्री कोकणात गणपतीपुळे येथे गेली होती. आज गुरुवारी (ता. २१) पहाटे सहलीची बस परतत असताना माळशिरस तालुक्यातील पाटील वस्तीजवळ सहलीची एस.टी. बस (क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४७०१) व टेम्पो यांची जोरदार धडक झाली. या बसमध्ये चालक, २ पुरुष व २ महिला असे एकूण ४ शिक्षक व ४० विद्यार्थी होते.
बस व टेम्पोची धडक एवढी भीषण होती की एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर अन्य शिक्षक व विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले असून, जखमींना उपचारार्थ अकलूज येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.