अहिल्यानगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा एकतर्फी विजय झाला असून विरोधकांचे पुरते पानिपत झाले आहे. या निकालानंतर ईव्हीएम हटवून मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, असा आग्रह आता महाविकास आघाडीकडून धरला जात आहे. अनेक पराभूत झालेल्या उमेदवारांनी ईव्हीएमवर आधारित मतदान प्रक्रियेवर शंका उपस्थित करून ईव्हीएममध्ये दोष असल्याचा सूर लावला आहे. ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या उमेदवारांना केवळ आक्षेप नको तर सबळ पुरावा गोळा करा अशा सूचना मूळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.
तसेच दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे आणि संदिप वर्पे यांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांनी रक्कमही जमा केली आहे.
आयोगाकडे पैसे केले जमा आता होणार पडताळणी..
राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि कोपरगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार संदीप वर्पे यांनी ईव्हीएम पडताळीसाठी अर्ज दाखल केला आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्याकडे अनामत रक्कम देखील भरण्यात आली आहे. तनपुरे यांनी राहुरीतील पाच केंद्रे तर वरपे यांनी कोपरगावातील एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केले असून जनतेची भावना आणि ईव्हीएमवर शंका असल्याने आपण अर्ज दाखल केल्याचे संदिप वर्पे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी मतदारसंघातून धक्कादायकरित्या पराभव झाला असून शिवाजीराव कर्डिले यांनी जवळपास ३५ हजारांहून अधिक मतांनी त्यांना पराभूत केले आहे. कोपरगावमध्ये अजित पवार यांच्या गटाचे आमदार आशितोष काळे यांनी संदीप वर्पे यांचा पराभव केला आहे.
काँग्रेस पक्षाकडूनही ईव्हीएमवर शंका..
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत ही गंभीर व चिंताजनक बाब आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का इतका कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.