अहमदनगर: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी पराभव केल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता आपला मोर्चाविधानसभा निवडणुकीकडे वळवला आहे. जिल्ह्यातील संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची विखे यांची तयारी असून पक्षाकडे याबाबत इच्छा व्यक्त केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत अहमदनगरच्या जनतेने सुजय विखेंचा पराभव करत निलेश लंके यांना खासदार म्हणून निवडून दिले. यानंतर आता माजी खासदार सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याने अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
माजी खासदार सुजय विखे यांनी संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. याबाबत विखे यांनी आपल्या पक्षाकडे इच्छा देखील व्यक्त केली आहे. जर पक्षाने आदेश दिला, तर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असतील, तर त्याचा थेट सामना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत रंगू शकतो.
बाळासाहेब थोरात हे सध्या संगमनेर विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. याशिवाय विखे यांनी राहुरी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्यास प्राजक्त तनपूरे विरूद्ध सुजय विखे अशी लढत होईल. आता लोकसभेत पराभूत झालेल्या सुजय विखे यांना नेमकी कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार? थोरात विखे सामना रंगणार का? अशा राजकीय चर्चांना जोर आला आहे.
दरम्यान शिर्डी विधानसभेची निवडणूक ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल, अशी माझी अपेक्षा आहे. कारण, आमच्या पक्षाचा निर्णय होणे, अद्याप बाकी आहे. कोणाला उमेदवारी मिळणार हा एक प्रक्रियेचा भाग आहे. त्याबाबत वेळ आली की, पक्ष निर्णय घेईल. पक्ष त्यांना संधी देईल. आमच्या परिवारात साहेबच सर्वप्रथम असणार आहेत, असं देखील सुजय विखे म्हणाले. आता राहिला मुद्दा माझा, माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे, त्यामुळे शेजारच्या मतदार संघाचा आढावा घेऊ, असे संकेत विखे यांनी दिले आहेत.