Sugarcane Transportation : करमाळा : कोंढार चिंचोली, डिकसळ (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील पूल जड वाहतुकीसाठी बंद असल्याने सध्या ऊस वाहतूक जिंतीमार्गे केली जात आहे. ऊसाच्या जड वाहतुकीमुळे जिंती, रामवाडी रेल्वे ब्रिजच्या दरम्यान मोठी दुरवस्था झाली आहे. तसेच ओव्हरलोड ऊस वाहतूक, वेगावर नियंत्रण नसल्याने कोणत्याही क्षणी ट्रॉली उलटून अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कोर्टी ते कोंढार चिंचोली हा रस्ता प्रवाशांसाठी जीव टांगणीला लावणारा ठरत आहे. यामुळे प्रवाशांना या रस्त्यावरून वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच बऱ्याच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलींना रिफ्लेक्टर नाहीत. यामुळे भविष्यात मोठ्या अपघाताचा धोका नाकारता येत नाही. मोठा अनर्थ घडण्यापूर्वीच कारखाना प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
प्रवाशांना त्रासातून मुक्ती देण्यासाठी कारखान्याने पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्ती करावी व ओव्हरलोड वाहनांवर तसेच रिफ्लेक्टर न बसवलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी प्रवाशांमधून होत आहे.
माझा मोबाईल विक्रीचा व्यवसाय भिगवण याठिकाणी असल्याने, मला रोज सावडी ते भिगवण असा प्रवास करावा लागतो. प्रवास करत असताना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्याने प्रवास करणारे अनेक प्रवासी खराब रस्ता व बेभान वाहतुकीमुळे त्रस्त आहेत.
– अक्षय एकाड, प्रवासी