अहमदनगर : ‘सहल’ म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहतात ती नामांकित प्रेक्षणीय स्थळे… थंडगार हवेची ठिकाणे… निळेशार समुद्रकिनारे… परंतु शाळकरी विद्यार्थ्यांना निर्भय बनवणारी ‘कायद्याची सहल’ थेट जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गेली तर कुणाला नवल वाटायला नको. दरवर्षी पोलीस स्थापना दिनानिमित्त अनेक उपक्रम राबवले जात असतात. मात्र, या आगळ्या-वेगळ्या सहलीला निमित्त होते पोलीस स्थापना दिनाचे…! कायद्याची कलमे, निर्भयतेचे धडे, पोलीस ठाण्याच्या कामकाजाबाबत माहिती देत पोलीस निरीक्षकांनी राबवलेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
नगर शहरातील तब्बल ५०० मुला-मुलींनी आणि शिक्षकांनी पोलीस ठाण्याच्या सहलीची अनुभूती घेतली. यामध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच चाँद सुलताना विद्यालय, अहमदनगर या विद्यालयांचा सहभाग होता. पोलीस ठाण्यात दैनंदिन कारभार कसा चालतो? पोलीस ठण्यात असणारे शस्त्र व इतर साहित्य दाखवून त्याबाबत सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांना रस्ता वाहतुकीचे नियम, महिला सक्षमीकरण, सायबर गुन्हे याबाबतही सविस्तर विश्लेषण करुन, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये अडचणी निर्माण होत असल्यास त्याबाबत तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून तयार करण्यात आलेली पत्रके सर्व विद्यार्थ्यांना वाटून जनजागृती करण्यात आली. पोलीस आणि पोलीस ठाण्याबाबत अनभिज्ञ असलेल्या मुली व महिलांची या उपक्रमामुळे भीती कमी झाल्याच्या अनेक प्रतिक्रिया या वेळी मुलींनी व्यक्त केल्या.
पोलीस निरीक्षक यादव यांच्यासोबतच सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भानसी, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी मोरे, पोलीस जवान राजेंद्र गर्गे, गजेंद्र पांढरकर, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल झाडबुके यांनीही मार्गदर्शन केले. या वेळी साबळे सर, भालेराव सर, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल चाँद सुलताना विद्यालयाचे पठाण सर, अकिल सर, प्रगत कला महाविद्यालयाचे गाडगे सर, श्रीमती भोरे, सरोदे, देशपांडे, गाजुल, ठुबे व कुलकर्णी आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
महिला-मुलींना निर्भय बनवण्यासाठी उपक्रम
शाळकरी, महाविद्यालयीन मुलींना स्वसंरक्षणासाठी उपलब्ध असलेली पोलीस यंत्रणा, महिलांविषयीचे कायदे, विविध कलमे आदींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, भीतीपोटी व कायद्याच्या अज्ञानामुळे मुली व महिला निमूटपणे अन्याय सहन करतात. अशा महिला-मुलींना निर्भय बनवण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवला आहे.
– चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक, कर्जत