कोल्हापूर : कोल्हापुरातून एक मनाला चटका लावणारी घटना समोर येत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील आयुष्याची चिंता सतावणाऱ्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने फरशी कापण्याच्या ग्राईंंडर मशीनच्या साहाय्याने गळा कापून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नीरज विकास सरगडे (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी सुधाकरनगरातील राहत्या फ्लॅटमध्ये घडली.
नीरज सरगडे हा आपल्या आई आणि आजोबासोबत आईच्या माहेरी सुधाकरनगर येथील बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहात होता. आपल्या भविष्याबद्दल तो सातत्याने चिंता व्यक्त करत होता. शिक्षण पूर्ण होण्यासाठी तसेच लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करू शकणार नाही या चिंतेने नीरज ग्रासलेल्या होता. यामुळे त्याने रविवारी राहत्या घरात टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. हा प्रकार रात्री ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.
नीरज रक्ताच्या थारोळ्यात
दरम्यान, परिसरातील नागरिकांना ग्राईंडर मशीनचा आवाज सातत्याने येत होता. त्यामुळे त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटकडे नागरिकांनी धाव घेतली. मात्र फ्लॅट बंद आढळला. त्यांनी संपूर्ण अपार्टमेंटची वीज बंद केली. त्यानंतर हाका मारूनही कोणी दार उघडत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने जाऊन फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता नीरज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
चिठ्ठीत भविष्याची चिंता
मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये नीरजने इंग्रजीत पानभर भविष्याची चिंता व्यक्त केली होती. यातूनच आत्महत्या करत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. नीरजची आई आपल्या माहेरी नीरजच्या आजोबांजवळ राहात होती. तो एकुलता असून रविवारी त्याची आई कऱ्हाड येथे गेली होती. नीरजने दुपारी कॉलेजला जाऊन आल्यानंतर घरी गेला आणि दार लावून घेत टोकाचं पाऊल उचललं. पुढील तपस पोलीस करत आहे.