-लहू चव्हाण
पाचगणी (सातारा) : पर्यटन नगरी पाचगणी शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी हौदास घातला असून दररोज तीन ते चार जणांचे लचके ही मोकाट कुत्री तोडत आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे पाचगणीकर हैराण झाले आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दल सोयरसुतक नसल्याचे दुर्दैवी चित्र पाचगणीत पाहायला मिळत आहे.
मोकाट कुत्र्याने मंगळवारी दुपारी (दि.17 सप्टेंबर) अडीचच्या सुमारास गावठाण येथील पालिका कर्मचाऱ्याच्या आईच्या पायाचा लचका तोडला. दुस-या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यटकाच्या पांच वर्षीय लहान मुलाचा मोकाट कुत्र्यानी चार ठिकाणी चावा घेतला. अशा घटना वारंवार घडत आहेत.
पाचगणी ग्रामीण रूग्णालयात दररोज तीन ते चार रूग्ण कुत्र्याने चावा घेतला म्हणून उपचारासाठी दाखल होत आहेत. केवळ सरकारी रुग्णालयातील ही आकडेवारी असून, खाजगी रूग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या वेगळीच आहे. यातील बहुतांश रूग्ण हे शहरातील असून, ग्रामीण भागातून येणा-या रूग्णांची संख्या कमीच आहे. विशेषत: मागील अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे.
मोकाट कुत्री लहान मुलांचे लचके तोडत आहेत. कुत्र्यांचे हल्ले वाढत असताना त्यांचा बंदोबस्त करण्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या प्राणीमित्र संघटनेविषयी नागरिकांकडून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. प्राणीमित्रांच्या भीतीपोटी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेले नगर पालिका प्रशासन याकडे नेहमीच कानाडोळा करीत आले आहे. मोकाट कुत्र्यांकडून हल्ल्याचे प्रकार घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे.